Thursday, August 25, 2016


                                                           गोकुळाष्टमी  


 
आपल्या हिंदू संस्कृतीचे भाग्य किती थोर आहे बघा ज्या संस्कृतीत मर्यादापुरुषोत्तम राम जन्मला त्याच संस्कृतीत श्रीकृष्णासारखा पूर्णपुरुषोत्तम युगपुरुषही जन्माला आला. वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते आपण रामाकडून शिकावे तर सामाजिक एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदिशाळेत,गोकुळात झाला  म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालाविणे म्हणजेच “काला” होय. यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता.
श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपण होते.ह्यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते.
भाविक मंडळी अष्टमीला उपवास करतात व नवमीला सोडतात. या दिवशी सर्व लहान थोर मानवी साखळी काढून रस्त्याने मिरवणूक काढतात. तेंव्हा घराघरातून लोक घागरी भरून त्यांच्यावर पाणी ओततात. ठिकठीकाणी चौकाचौकात बांधलेली दहीहंडी मानवी मनोरा रचून शाररीक कौशल्याने ती फोडतात ह्या सणातून आपल्याला खेळाचे, शाररीक कौशल्याचे म्हणजेच आरोग्याचे महत्व पटते. समाजात एकोपा राहण्यासाठी, प्रेम वाढविण्यासाठी असे खेळ खूप मोलाची भूमिका निभावतात. श्रीकृष्ण तर दहीहंडी, विटीदांडू, मल्लकुस्ती अशा खेळांचा आद्यपुरस्कर्ता होता. ह्या सर्व भारतीय खेळांचा प्रसार श्रीकृष्णामुळे सर्वसामान्यांपर्यंत झाला.
श्रीकृष्णाने कर्माचे महत्व गीतेद्वारे सांगून आपल्या कर्तव्यात कधीही कसूर करू नये हा संदेश समाजाला दिला. श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य हे  समाजासाठी एक आदर्श होऊन राहिले आहे. त्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात खेळ, समाज, तत्वज्ञान, नैतिकता,कर्तव्य एक आदर्श  निर्माण केला आहे. जो आपल्याला एका दीपस्तंभासारखा दिशा दाखवत राहील.
श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करीत रहावे. फळाची किंवा कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवू नये. आसक्तिरहित कर्मच श्रेष्ठ ठरते. अशा या प्रयत्नवादी, ध्येयवादी पुरुषोत्तमाने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा निश्चय करणे हाच गोकुळाष्टमीचा संदेश आहे.