Tuesday, January 30, 2018

#shalaamachitumachi

प्रिय शाळेस...
ओळखलस का मला... एके काळी तुझ्याच अंगणात खेळलेला, बागडलेला मी तुझा एक माजी विद्यार्थी... तुझ्या सहवासात असतांना तुला खूपदा औपचारिक पत्र लिहिली... पण, आज मुद्दाम तुला हे अनौपचारिक पत्र लिहित आहे... कारण, मला येणारी तुझी आठवण औपचारिक पत्रात नीटशी व्यक्त करता येणार नाही...
१० वी च्या परीक्षेनंतर तुझ्यापासून दूर जात होतो पण, त्यावेळी त्याच इतकसं दुःख मला जाणवलं नव्हतं कारण, ‘शाळा’ नावाच्या पिंजऱ्यातुन माझी आता एकदाची सुटका होणारं... आता आकाशात मी स्वच्छंद भरारी घेणार... या कल्पनेनच मी सुखावलो होतो...
पण तुला सांगू का... या धकाधकीच्या, धावपळीच्या जगरहाटीच्या आकाशापेक्षा तुझा तो पिंजराच खूप सुरक्षित होता याची आता मला जाणीव होतेय...
मला तुझ्या या पिंजऱ्यामध्ये पुन्हा एकदा अडकायचंय...
पाठीवर दप्तर घेउन तुझ्याकडे यायचंय...
ते राष्ट्रगीत, ती प्रतिज्ञा आणि प्रार्थना म्हणायचीय...
आणि फळ्यावर सुंदर अक्षरात एक सुविचारही लिहायचाय...
विज्ञानाचे प्रयोग कुतूहलाने पाहायचेत...
बैजिक राशी अन् भूमितीची प्रमेयं सोडवायचीत...
मंत्रमुग्ध करणारा इतिहास ऐकायचाय...
आणि हो मराठीचं व्याकरण, संस्कृतातली सुभाषितं सुद्धा शिकायचीत...
मधल्या सुट्टीतला पोषण आहार, आणि मित्रांचा डबा खायचाय...
पीटीच्या तासाला मनसोक्त कबड्डी, खो-खो खेळायचंय
ग्रंथालयातली गोष्टीची छान पुस्तक वाचायचीत...
आणि एखाद्या मोकळ्या तासाला बाकावर कान ठेवून तबलाही वाजवायचाय...
स्वातंत्र्य दिनाला स्वच्छ गणवेशात झेंडावंदन करायचंय...
वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाषण करायचंय...
निबंध स्पर्धेतही पहिला नंबर मिळवायचाय...
आणि, नाट्यवाचनाच्या स्पर्धेत तुझ्यासाठी बक्षीस आणायचंय...
विज्ञान प्रदर्शनासाठी एक ‘भन्नाट’ प्रकल्प करायचाय...
शरद मल्हार महोत्सवात समूहगीत गायचंय...
वार्षिक स्नेहसंमेलनात नाच करायचाय...
आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एकदो करतही चालायचय...
सहलीला जाऊन नुसती धम्माल करायचीय...
परीक्षेच्या आधी खूप सारा अभ्यास करायचाय...
आणि पुरवण्या जोडलेली उत्तरपत्रिकाही लिहायचीय...
खरतरं मला तुझ्या सानिध्यात घालवलेल्या एकूणच क्षणांची पुनरावृत्ती करायचीय... तुझ्या सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण पुन्हा एकदा अनुभवायचेत... यासाठी तू मला परत तुझ्याकडे बोलावशील का ?
निरोप समारंभाच्या वेळी मुख्याध्यापक सर म्हणाले होते “तुमचे शाळेतले दिवस हे सुवर्णाक्षरात कोरलेले दिवस आहेत.. कितीही किंमत मोजलीत तरी ते तुम्हाला आता पुन्हा मिळणार नाहीत...”
त्यामुळं तुझ्यासोबत घालवलेले ते मौल्यवान क्षण माझ्या वाटेला परत येणार नाहीत... याचीही मला अगदी पुरेपूर जाणीव आहे...
पण, मला तुझे मनापासून आभार मानायचेत... या समाजाच्या अथांग आकाशात झेप घेण्यासाठी तू माझ्या पंखांना बळ दिलेस... माझ्यातील नीतिमूल्यांचा तू आविष्कार घडवलास... माझ्यात जे काही चांगल आहे हे तुझ्याचं संस्कारांचं देण आहे... आणि याकरिता मी तुझा सदैव कृतज्ञ राहील...
माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक यशातून मी तुझे नाव उंचावण्याचा नक्की प्रयत्न करेल...
तुझा आजन्म ऋणी असलेला
एक माजी विद्यार्
#Abhijeet Jadhav
#SAT
#shalaamachitumachi

No comments:

Post a Comment